(दि.११-३-२०२२ म्हणजेच शंभूराजेंची पुण्यतिथी.... त्याबद्दल आदरांजली.लेख मोठा आहे पण,राजांबद्दल प्रत्येकाला माहीत असणे हे आपले कर्तव्य आहे.....)
इ.स.१६५७, तारीख १४ मे रोजी पुरंदर गडावर शंभू राजांचा जन्म झाला.त्यांच्या जीवनात सुरूवातीपासूनच अनेक अडचणी आल्या. दोन वर्षांचे असतानाच त्यांची आई सईबाईंचे निधन झाले. पण त्यानंतरही खचून न जाता त्यांनी अनेक शस्त्र व शास्त्र यांचा अभ्यास केला. तेरा वर्षापर्यंत त्यांना तेरा भाषा अवगत होत्या. शिवाय तलवारबाजी, घोडेस्वारी ,अनेक शस्त्रांत ते पारंगत होते. नवव्या वर्षी ते शिवरायांसोबत औरंगजेबाचे निमंत्रण स्वीकारून आग्रा येथे गेले. पण भर दरबारात अपमान झाल्याने शिवरायांनी बादशहाला भरदरबारात सुनावले. या संधीचा फायदा घेऊन बादशहाने शिवराय व शंभुराजे यांना नजरकैदेत ठेवले. पण शिवरायांनी युक्तीचा वापर करून कैदेतून सुटका करून घेत राजगड गाठला. पुढे शंभूराजेंचा पिलाजी शिर्के यांच्या कन्या येसूबाई यांच्याशी विवाह झाला. हळूहळू शंभुराजे मोठे होऊ लागले. रणनीती व युद्ध कलेत पारंगत झाले.
इसवी सन १६८० मध्ये शिवरायांचा मृत्यू झाला. स्वराज्यातील ब-याच कारभाऱ्यांना शंभूराजे छत्रपती म्हणून मान्य नव्हते. अनेकांनी त्यांच्याविरुद्ध फितुरी केली. पण शेवटी सर्वांनीच शंभूराजांच्या राज्याभिषेकाला मान्यता दिली. यावेळी कटकारस्थान करणा-या कारभाऱ्यांनाही संभाजीराजेंनी माफी दिली. त्यानंतरही त्यांनी अनेक मोहिमा केल्या.
छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गड किल्ले काबीज केल्यानंतर गोव्याच्या मोहिमा सुरू केल्या. तेथील पोर्तुगीजांना अद्दल घडवली. शिवाय औरंगजेब बादशहा वर दोनदा हल्ले केले. एकदा औरंगजेबाचे बुऱ्हाणपूर तर एकदा सुरत शहर लुटले. अनेक युद्धांमध्ये विविध सुलतानांच्या फौजेला परास्त केले. यानंतर पुन्हा स्वराज्याच्या काही कारभाऱ्यांनी शंभूराजेंच्या विरोधात कट रचले. यावेळी मात्र शंभूराजांनी त्यांना माफ केले नाही. काहींना हत्तीच्या पायी दिले, तर काहींना तोफेच्या तोंडासमोर उभे केले. फितुरांना माफी नाही हे स्वराज्यातील प्रत्येकास सांगितले. पुढे त्यांनी औरंगजेबावर सोलापूर येथेही हल्ला केला.
आता मात्र बादशहा चवताळला. शंभूराजांना पकडण्यासाठी त्याने मुकर्रबखान या सरदाराला पाठवले. मुकर्रब खान हा पूर्वीचा शेख निजाम. तो कुतुबशहाशी फितुरी करून मोगलांकडे आला होता. खुप मोठी फौज घेऊन तो शंभुराजांना पकडण्यास निघाला. संभाजी राजे त्यावेळी संगमेश्वर येथे होते. एक दिवस त्यांचा संगमेश्वर येथे न्यायनिवाडा चालू होता. त्यावेळी शंभूराजे बेसावध होते. शंभूराजांचे मेव्हणे म्हणजेच येसूबाई यांचे भाऊ गणोजी शिर्के हे मुघलांना जाऊन मिळाले होते. त्यांच्याच मदतीने मुकर्रबखान संगमेश्वर येथे येऊन पोहोचला. त्याने अकस्मात शंभूराजेंच्या वाड्यावर हल्ला केला. मुघलांची फौज मराठ्यांच्या तुलनेत खूप मोठी होती.
कारभाऱ्यांनी शंभूराजे यांना तातडीने रायगडाकडे निघण्याची विनंती केली. परंतु सर्वांत सोडून जाण्यास शंभूराजे तयार नव्हते त्यांनी तलवारी काढल्या व युद्ध करण्यास सज्ज झाले. छत्रपती संभाजी महाराज, छंदोगामात्य कवी कलश, सर सेनापती म्हाळोजी बाबा व असे अनेक वीर लढत होते. पण दुश्मनी फौस फार जास्त असल्याने हळूहळू मराठ्यांचा पराभव होऊ लागला. त्यामुळे ही परिस्थिती समजून शेवटी शंभूराजांनी रायगडाकडे निघण्याचा निर्णय घेतला.
ते रायगडाकडे निघणार इतक्यातच मुकर्रबखान त्याची तुकडी घेऊन तीथे त्याला. शेकडो तलवारींनी शंभू राजेंना घेरले. रयतेचे राजे आता गिरफ्तार झाले होते. मुकर्रबखान त्यांना घेऊन तुळापूर येथील औरंगजेबाच्या छावणी कडे जायला निघाला. छत्रपती संभाजी महाराज व छंदोगामात्य कवी कलश यांना अत्यंत क्रूरपणे बादशहाच्या छावणीपर्यंत नेण्यात आले. शंभू राजांचा जिरेटोप जमिनीवर फेकण्यात आला. त्यांना विदूषकाची टोपी घालून देण्यात आली. गाढवावर बसवून त्याची धिंड काढण्यात आली. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या.
शंभूराजांना औरंगजेबाच्या छावणीत आणण्यात आले. बादशाहाला ही बातमी समजताच त्याला अतिशय आनंद झाला. त्याच्या नेहमीच्या मार्गाने म्हणजेच दगाबाजी ने शंभूराजांना पकडले होते. त्याने अल्लाची प्रार्थना केली व त्याचे आभार मानले. दरबारात शंभूराजांना हजर करण्यात आले. बादशाह समोर शंभूराजांना नाक रगडून कुरनिस करण्यास सांगण्यात आले. परंतु तसे न करता शंभूराजे म्हणाले,"आम्ही स्वराज्याचे छत्रपती आहोत आणि या दरबारातील प्रत्येकाने आम्हाला मुजरा करावा."हे ऐकून बादशहाला राग आला. पण त्याने शंभूराजांना दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली, तर सोडून देईल असे सांगितले.
त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे स्वराज्याचा विशाल असा खजिना कुठे ठेवला आहे? आणि दुसरा प्रश्न असा की मुघलांचे कोणते सरदार शंभूराजेंच्या सोबत होते? शंभूराजेंनी उत्तर देण्यास साफ मना केले. तरीही औरंगजेबाने पन्नास हजाराची मनसबदारी देण्याचे सांगून शंभूराजांना इस्लाम धर्मात येण्यास सांगितले. परंतु शंभूराजेंनी कोणतीही अट मान्य केली नाही. शंभूराजेंना मृत्यू समोर दिसत होता परंतु ते धर्म सोडण्यास तयार नव्हते.
शेवटी बादशहाने मृत्यूची धमकी दिली आणि शेवटचे विचारले. त्यावर शंभुराजे म्हणाले,"आम्ही मृत्यूला घाबरत नाही. तू आज एक संभाजी मारशील, पण स्वराज्याच्या प्रत्येक घरात असे हजारो-लाखो संभाजी जन्म घेतील. आणि छत्रपतींना तर तु मारूच शकत नाही. कारण, छत्रपती हा कोणता व्यक्ती नाही तो एक विचार आहे, आणि विचार अमर असतात."शंभुराजेंचे हे उत्तर ऐकून आता बादशहा फारच चिडला. त्याने शंभूराजांना कोठडीत ठेवण्याचा हुकुम दिला.
औरंगजेबासमोर डोळे झुकवले नाही म्हणून राजेंचे व कवी कलशांचे डोळे फोडण्यास सांगितले. बादशहाच्या प्रश्नास अपमानास्पद उत्तरे दिली म्हणून त्यांची जीभ छाटण्यास सांगितली. शिवाय कातडी सोलण्यास आणि रोज चाबुकांचे, दांडपट्ट्याचे आणि इतरही शस्त्रांचे फटके देण्यास सांगितले. रोज जखमांवर सकाळ-संध्याकाळ मिठाचे पाणी टाकण्यास सांगितले. आणि तेही एक - दोन दिवस नाही तर तब्बल 40 दिवस. शेवटच्या दिवशी शंभूराजे व कवी कलश यांचे तुकडे-तुकडे करून नदीच्या काठी फेकण्यास सांगितले. इतिहासातील या सर्वात कृर मुघल बादशहाने किंबहुना सैतानाने इतक्या क्रूरतेने राजेंची हत्या केली. पण राजांनी या सर्व अत्याचारांना तोंड देताना साधं 'आहऽऽ' असं सुद्धा म्हंटलं नाही. केवढी ही सहनशक्ती!!! केवढी ही धर्मनिष्ठा!!! राजेंनी मृत्यूवरही विजय मिळवला. ते शिवबांचे शूर छावे होते. ते मृत्युंजय होते..........🚩🚩🚩
Comments
Post a Comment